खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिल्हे येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांच्या सेवेने मोठ्या उत्साहात संपन्न!

कोलाड (श्याम लोखंडे ) कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र चिल्हे येथे ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत गेली सात दिवस चालत असलेला हा हरीनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळा जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप कीर्तन महोत्सव चिल्हे येथे मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदरच्या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांचे अलौकिक मार्गदर्शनातून मंत्रमुग्ध होऊन याचा भक्तिमय वातावरणात उपस्थित सांप्रदायिक भक्तगणांनी श्रवण करत आनंद लुटला.

रोहा तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करत असलेल्या खांब पंचक्रोशीचा ६९ वे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी १६ मार्च रोजी खांब पंचक्रोशीचे वैभव तथा आधिस्थान रायगड भूषण विद्या वाचस्पती डॉ.हभप मारुती महाराज कोलाटकर यांच्या काल्याच्या किर्तनाने तसेच सद्गुरू वै.स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबाकर महाराज यांच्या चरण पादुका तसेच श्रींच्या पालखी सोहल्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोकण वारकरी संप्रदायचे श्रद्धास्थान सद्गुरू गुरुवर्य वै.गणपत बाबा गुडेकर (अलिबागकर) महाराज, गुरूवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोलाटकर, यांच्या कृपाशीर्वादाने हभप नारायण दादा अलिबागकर वाजे मठाधिपती पंढरपूर, हभप दत्तू महाराज कोलाटकर, यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड भूषण तथा खांब पंचक्रोशीचे आधिस्थान हभप डॉ.मारूती महाराज कोलाटकर यांच्या नेतृत्वाखाली, श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी, चिल्हे ग्रामस्थ यांच्या वतीने गेली सात दिवस ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, श्री संत तुकाराम महाराज सामूहिक गाथा पारायण भजन, संपुर्ण हरिपाठ प्रवचन,हरी कीर्तन हरी जागर, अशा धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम सप्ताह महोत्सव गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हा उत्सव मोठ्या आनंदाने संपन्न झाला .

खांब पंचक्रोशीतील श्री क्षेत्र चिल्हे येथे मोठ्या आनंदायी वातावरणात ९ मार्च ते १६ मार्च या कालावधीत सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता सोमवारी काल्याच्या किर्तनाने करण्यात आली.तर गेली सात दिवस त्यानिमित्ताने येथील युवक,युवती महिला तसेच माहेरवाशी आदी ग्रामस्थ मंडळी यांनी आगळ्या वेगळ्या प्रकारचे सजावटीतून देखावे सादर केले संपुर्ण गाव कणा रांगोळ्या फुलांनी सजविण्यात आले घरो घरी आनंदाच्या गुढी आणि उंच भगवी पताका उभारण्यात आली होती तर मंदिर परिसर तसेच ऐतिहासिक शिवकालीन म्हणून छत्रपति शिवाजी महाराजांचे मावळे बाजी प्रभू यांची पावनखिंड देखावा, संत परंपरेतील झोपडी आणि संतांची माहिती असे देखावे वेगवेळी रांगोळी आकर्षक ठरत होती तर मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाले होते.तर दरदिवशी किर्तन रूपी सेवेत कीर्तनकार महाराजांसमवेत चक्क विविध संतांची वेशभूषा परिधान करून किर्तनकार यांचे जल्लोषात स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी तर सात दिवस नाम जप तप पठण हरी जागर असे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप यज्ञ नाम ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, संत तुकाराम महाराज यांच्या गाथेवरील भजन वीणा जागर पारा संपुर्ण हरिपाठ तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तर श्री संत एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हभप नारायण दादा अलिबागकर वाजे पंढरपूर,हभप भरत महाराज अलिबागकर वाजे पंढरपूर, रामदास महाराज टोंगले खांब, रामदास महाराज पाटील खानाव, तुकाराम महाराज शिंदे देवाची आळंदी, सचिदानंद कांबेकर कांबे खालापूर, विशाल महाराज खोले मुक्ताई नगर, जगन्नाथ महाराज पाटील शहापूर,रायगड भूषण तथा विद्या वाचस्पती डॉ.मारुती महाराज कोलाटकर,अशा थोर कीर्तन सम्राट व कीर्तनकार तसेच प्रवचनकार महाराज यांच्या सेवेचा तसेच पारायणाला चिल्हे ग्रामस्थ युवक,युवती, मुंबईकर व विशेषतः माहेर वाशिनी यांचा मोठा सहभाग तसेच खांब पंचक्रोशीतील खांब,नडवली,तळवली, धानकान्हे ,आदी भागातील वारकरी संप्रदाय मंडळी भाविक भक्त उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा आनंद लुटत याचा लाभ घेतला तसेच या सप्ताह प्रसंगी अन्नदाते तसेच माहेर वाशिनी,ग्रामस्थ, आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे मोठे आर्थिक सहकार्य लाभले.चिल्हे येथील युवक,युवती, महिला आणि ग्रामस्थ यांनी हा धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेली सात दिवस अथक परिश्रम घेतले तसेच प्रवचनकार कीर्तनकार महाराज त्याच बरोबर या सप्ताह प्रसंगी  वारकरी मंडळी, सामजिक, राजकिय,शैक्षणिक, वारकरी संप्रदायसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सदिच्छा भेट दिली यांचे ग्रामस्थांनी आणि पंचक्रोशी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog