रोहा तालुक्यातील घटना!
पुराच्या पाण्यामुळे गोवे गावातील रस्ता गेला वाहून भातशेतीचे मोठे नुकसान!
कोलाड (विश्वास निकम ) रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात गोवे गावातील रस्ता तीन चार दिवस पडलेल्या ढगफुटी सारख्या तुफान पावसामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेला असुन या रस्त्यावरुन गोवे गावात जाण्यासाठी रिक्षा,फोरव्हीलर व इतर वाहने जाण्यासाठी जागाच राहिली नसल्याने या मार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याशिवाय या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेला राब पुराच्या पाण्यात कुजून गेल्याने भात लावणी करणे अशक्य झाले आहे. यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला असुन याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार या वर्षी पाऊस कमी पडेल असे बोलले जात असतांना एक महिना उशीरा पावसाने सुरुवात केली असली तरी यानंतर ५ ते ८ जुलै रोजी पडलेल्या तुफान पावसामुळे एका क्षणात होत्याचे नव्हतं करून सोडले असुन रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका व महिसदरा दोन्ही नदीच्या बेचक्यात असणाऱ्या गोवे गावाची अवस्था अतिशय बिकट झाली असुन लावणी करण्यासाठी एका ही शेतकऱ्याचा राब राहिला नाही तर गावात जाण्यासाठी सुसज्ज बनविण्यात आलेला रस्ता या पुराच्या पाण्यात वाहून गेला यामुळे गावात जाणाऱ्या रिक्षा,मिनिडोअर, फोरव्हीलर वाहने जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पूर्वी या परिसरात उन्हाळी व पावसाळी अशी दोन्ही पिके घेतली जात होती.परंतु मूठवली बंधारा जीर्ण झाल्यामुळे येथे उन्हाळी भातशेती करणे अवघड झाले नंतर खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने एक कोटी रुपये खर्च करून मूठवली बंधारा बांधण्यात आला याला सात ते आठ वर्षे उलटून गेली तरी अद्याप उन्हाळी भातशेतीला पाणी मिळेना याल कोलाड पाटबंधारे खाता जबाबदार आहे कारण फक्त धरण बांधण्यात आला. परंतु पाणीपुरवठा करणारे, कालवे,पोटकालवे,मोऱ्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.याशिवाय अनेक वर्षापासून या नदीला अनेक ठिकाणी गेलेल्या खांडी यामुळे पावसाळी ही भातपीक घेणे कठीण झाले आहे.
गेली सात ते आठ वर्षांपासून ही परिस्थिती असुन गोवे गावातील शेतकरी वर्गाला ना उन्हाळी भात पिक मिळे ना ! तर नाही पावसाळी भात पिके घेणे अवघड झाले आहे.अनेक वेळा पाटबंधारे खात्याला नदीला गेलेल्या खांडी भरण्यासाठी संरक्षण भिंती बांधण्यासाठी अर्ज केला होता परंतु पाटबंधारे खात्याकडून थातूर मातुर कामे केले परंतु परिस्थिती जैसे थे अशी आहे.म्हणजे एक ना धडभाराभर चिंध्या अशीच आहे.
प्रतिक्रिया :- विस ते पंचिवीस वर्षापूर्वी गोवे गावातील शेतकरी उन्हाळी व पावसाळी अशी वर्षातून दोन्ही पिके घेत होता यामुळे संपूर्ण वर्षाचा खर्च भागून शेतकरी वर्गाच्या गाठीला पैसे रहात होते परंतु आता परिस्थिती उलट असुन गेली अनेक वर्षांपासून उन्हाळी पाटबंधारे खात्याचा आडमुठपणाचा धोरण व पावसाळी निसर्गाचा कोप यामुळे या गावातील दोन्ही भात पिके नष्ट झाली असुन मजुरी,मशागतीची कामे,खताच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली असुन ही शेतकरी नं डगमगता भातशेतीची कामे करीत आहेत परंतु त्याच्या पदरी निराशाच आहे यामुळे यापुढे पाटबंधारे खाते यांनी महिसदरा नदीला गेलेल्या खांडी व इतर कामे करून पाणी पुरवठा करावा यामुळे दोन्ही पिके पूर्ववत सुरु होतील अशी मागणी करण्यात येत आहे.
राजेश शिर्के,शेतकरी व गावकमेटी अध्यक्ष गोवे




Comments
Post a Comment