गोरेगाव येथील कालभैरव जत्रा उत्सवात उंच खांबावरील लाट फिरवणे ठरत आहे मुख्य आकर्षण, भिनाड गावाच्या काठीला मुख्य मान
कोलाड (विश्वास निकम ) चैत्र महिना सुरु झाल्यानंतर कोकणात जत्रेची धामधूम खऱ्या अर्थाने होते.याप्रमाणे सालाबाद प्रमाणे गोरेगाव येथील काल भैरवनाथ जत्रा अनेक वर्षांपासून सुरु आहे.यावर्षी कालभैरवनाथाची जत्रा चैत्र चतुर्दशी मंगळवार ३१ मार्च २०२६ रोजी आहे या जत्रेचा विशिष्ट आकर्षण म्हणजे उंच खांबावरील लाट फिरवणे हे असुन या जत्रेमधील विशिष्ट मानाची काठी म्हणून भिनाडच्या काठीचा मोठा मान सन्मान असतो.
भिनाड गावाच्या काठीच्या मानामागे फार मोठा जुना इतिहास असुन तो इतिहास पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. पूर्वी गोरेगावातील कालभैरवनाथाच्या जत्रेत लाट फिरवण्याच्या वेळी काही वाईट शक्ती अडथळा करत होत्या. तो इतिहास पूर्वीपासून असा सांगितला जातो की गोरेगावातील लाट फिरवत्या वेळी जो अडथळा येत होता तो दूर करण्यासाठी गोरेगावातील जानकार मंडळींनी काही आत्मज्ञान असलेल्या लोकांकडे विचारणा केली असता असे सांगण्यात आले की या लाटेच्या उत्सवात येथील कालभैरव हे देवस्थान येऊ शकतात.परंतु या उत्सवात भिनाड गावाची काठी बोलावून तिला मानाची काठीचा मान देऊन सर्व अडचणी दूर होऊ शकतात असे सांगण्यात आले.
तसे पाहता पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने नव्हती व भिनाड गाव कोठे आहे हे माहीत नव्हते तरी पण विचारत विचारत गोरेगाव मंडली भिनाड गावी आले व सर्व वृत्तांत सांगितला व गावकऱ्यांना सुपारी देऊन आमंत्रित केले आमंत्रणला मान देऊन भिनाड ग्रामस्थांनी मानाची काठी सुरु केली तेव्हा पासुन वाईट शक्तीचा नायनाट झाला.व लाट उत्सव बिना अडथळ्याविना पूर्णत्वास जाऊ लागला.यामुळे आज पर्यंत ही परंपरा दोन्ही गावांनी जपली आहे.
भिनाड गावातील गावकरी काठी घेऊन सकाळी नऊ वाजता भिनाड येथून निघून ते करंजेवाडी,कालवन,नानोरे माणगाव,लोणसी,वावे मार्गे गोरेगाव रात्री दोन वाजता जत्रेसाठी च्या उत्सवासाठी पोहोचतात या गावांमधून जाताना प्रत्येक गावाला भेटी देत या गावातील प्रत्येक जण नवस व प्रत्येक वर्षाची भेट म्हणून काठीला नारळ देतात.
या जत्रेच्या एक दिवस आधी भिनाड गावात जत्रेचा छबिना मोठा दिमागदार व उत्साहात पार पडतो या दिवशी देव प्रत्येकाच्या दारी जाऊन भेट देतो या कार्यक्रमाला ग्रामस्थ व मुंबईकर व अन्यत्र नोकरी निमित्त असणारे सर्व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात.


Comments
Post a Comment