रोटरी क्लब रोहा तर्फे ई-कचरा संकलन मोहीम

रोहा शहर व आजूबाजूचा परिसर ई कचरामुक्त होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रोहाचा स्तुत्य उपक्रम,

           गोवे-कोलाड (विश्वास निकम )

                     रोटरी क्लब ३१३१ व रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या पुढाकाराने रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता रोहा शहरातील विविध ठिकाणी ई-वेस्ट इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन करण्याचा पुढाकार घेऊन कचरा जमा करण्यात आला आहे. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व या कचऱ्याच्या संकटातून रोहा शहराला बाहेर काढण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न या संस्थेमार्फत या पुढे करण्यात येणार आहे. या कचर्‍याच्या संकटातून रोहा शहराला बाहेर काढण्यासाठी सर्व नागरिकांना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र नुला यांनी आवाहन केले आहे की, आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करीत आहोत की, तुमच्या घरातील ई कचरा या संकलन मोहिमेमध्ये आणून द्या. आणि त्याचा योग्य पुनर्वापराची हमी आम्ही देतो. तरी रोहावाशीयांनी जास्तीत जास्त संख्येने या मोहिमेमध्ये सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत करू या. असे त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे. रोहा शहरातील मारुती चौक, रायकर पार्क, अंधार आळी, तीनबत्ती नाका, दमखाडी अशा विविध ठिकाणी आपल्या जवळील इलेक्ट्रॉनिक्स कचरा जमा करा. तो जमा झालेला कचरा आम्ही जमा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणार आहोत असे पुढे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी रो. विश्वेश वेदक, ट्रेझरर रो.संजय नारकर, रो. विदुला परांजपे, रो.अलेफिया रोहावाला, ऍन्स.शितल शहा, रो.विक्रम जैन, ऍन्स.दिपा चव्हाण आदी उपस्थित होते.तर संस्थेच्या महिला सदस्य सौ. निफा शहा, सौ. विद्या नुला, सौ. पूनम वेदक, सौ. सुनिता नारकर, सौ. स्वप्नाली निंबाळकर, सौ. सुप्रिया महाडिक, सौ. रूपाली यादव, सौ. भक्ति जैन, सौ. समृद्धी राणे, सौ.दिप्ती जैन, सौ.पूजा पटेल, सौ. रसिका मेहता, रो.विक्रम जैन, रो. भारत पटेल, रो.राजीव शहा, रो.भावेश जैन, रो. स्वप्नील धनावडे, रो. प्रदीप मेहता, रो. आशिष शहा तसेच मोठ्या संख्येने रोहा शहरातील नागरिक यावेळी सहभाग घेतला होता.

ई-चर्‍याची गंभीर समस्या काय आहे हे उपस्थितांना संस्थेने पटवून दिले.इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कचर्‍याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाईल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. गंभीर आजारांचे स्रोत बनलेल्या या ई-कचर्‍याचे भारतासारख्या विकसनशील देशांत बरेच जास्त प्रमाण आहे.

                पूर्वी मोठे काॅम्पुटर आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा स्लिम कॅबिनेट आणि फ्लॅट मॉनिटर्सनी घेतली आहे. माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही ई-कचरा या प्रकारात येतात. जुन्या डिझाइन्सचे कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हा सुद्धा ई-कचराच. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात ई-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.                                                                       वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचर्‍याचे व्यवस्थापन करुन तो नष्ट करण्यासाठी२००८ मध्ये काही नियम बनवले होते. आता टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर डंप केला, तर त्यासाठी दंडाबरोबरच शिक्षेचीही तरतूद असलेला इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट ॲन्ड हॅंडलिंग) कायदा-२००० लागू झाला आहे.या कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही टाकू शकत नाही. आपल्याला ई-कचरा सरकारने अधिकृत केलेल्या एजन्सीजना द्यावा लागेल. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणताही नागरिक त्याचे जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य तीन पद्धतीने नष्ट करू शकतो. यामध्ये अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकलिंग करणार्‍या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणार्‍या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावता येईल. मात्र, या कायद्यातील काही तरतुदींबद्दल इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी विरोधही दर्शवला आहे. कायद्या अंतर्गत ई-कचरा एकत्र करणे ही इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची जबाबदारी असेल. सर्वात चिंतेची बाब म्हणजे देशामध्ये निर्माण होणारा हजारो टन ई-कचरा पारंपरिक भंगारवालेच खरेदी करतात. अशा प्रकारचा कचरा खरेदी करण्यासाठी त्यांना अनुमती नाही आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही त्यांच्याकडे नाही. सरकारद्वारे वेगवेगळ्या ठिकाणांहून ई-कचरा एकत्र करण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे. देशामध्ये ६०० पेक्षा जास्त ई-कचरा संग्रहण केंद्रेही आहेत. पण ज्या प्रमाणात ई-कचर्‍याची निर्मिती होत आहे, त्यामानाने ही संख्या कमी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ६०० केंद्रांवर प्रत्येक वर्षी जवळजवळ सुमारे ३००० टन ई-कचराच रिसायकल केला जातो. एका अहवालानुसार, येत्या १० वर्षामध्ये भारत, चीन आणि अन्य विकसनशील देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्रीत मोठ्या वेगाने वाढ होईल आणि पर्यायाने त्यातून निघणार्‍या ई-कचर्‍याचा पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. या अहवालानुसार, सध्या प्रत्येक वर्षी भारतात रेफ्रिजरेटरमधून एक लाख टन, टेलिव्हिजनमधून दोन लाख ७५ हजार टन, कॉम्प्युटरमधून ६० हजार टन, प्रिंटरमधून ५ हजार टन आणि मोबाईल फोनमधून एक हजार सातशे टन ई-कचरा निर्माण होतो. सन २०२० पर्यंत जुन्या कॉम्प्युटरमुळे ई-कचर्‍याची ही आकडेवारी भारतात ५०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे या महाभयंकर ई-कचर्‍याच्या रिसायकलिंगबाबत कायद्याचे कडक पालन केले नसल्यास गंभीर संकटाचा सामना करावा लागेल.

Comments

Popular posts from this blog