सामाजिक वनीकरण विभागामार्फत वांगणी हायस्कूलमध्ये वनमहोत्सव साजरा

 नागोठणे (प्रतिनिधी) सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी , तालुका रोहा या शाळेत सामाजिक वनीकरण विभाग रोहा यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक ६ जुलै २०२२ रोजी वनमहोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  यावेळी सामाजिक वनीकरण विभाग रोहा येथील वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनपाल दिलीप वाघे , वनपाल शंकर कराडे , वनरक्षक धिरेश थळकर  , शाळेचे मुख्याध्यापक जयहिंद ठाकूर, हरितसेना प्रमुख टिळक खाडे , शाळेतील शिक्षक अरविंद शेळके , नरेंद्र पाटील, विकास म्हात्रे , वन कर्मचारी सुरेश वाघमारे , सुनिल लांगी आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी शाळेच्या परिसरात करंज , चिंच , कदंब , फणस , पिंपळ , जांभूळ , फणस आदी स्थानिक प्रजातींची पन्नास वृक्षांची रोपटी लावण्यात आली . या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी ' पर्यावरणाचे ठेवा भान , तरच बनेल देश महान ' , ' झाडे लावा , चैतन्य फुलवा ' अशा आशयाचे फलक हातात घेऊन वृक्षसंवर्धनाचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला . शाळेतील विद्यार्थीनींनी  पारंपरिक वेशभूषा करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली . यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावण्याचे व त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.

. वनपाल दिलीप वाघे यांनी पृथ्वीवरील वनाच्छादित क्षेत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी आपापल्या गावात , मोकळ्या जागेत व शेतावर जास्तीत जास्त झाडे लावण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील हरितसेना प्रमुख विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog