रायगड जिल्ह्यात ऑनलाईन गणित संबोध परीक्षा संपन्न
|
संग्रहित छायाचित्र |
गोवे-कोलाड (विश्वास निकम ) रायगड जिल्हा गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाईन गणित संबोध परीक्षा रायगड जिल्ह्यात संपन्न झाली . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गणित विषयातील संबोध व संकल्पना पक्क्या होउन त्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून दरवर्षी रायगड गणित विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने या गणित संबोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. आठवीपर्यंतचा गणिताचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी निर्धारित करण्यात आला होता.ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची होती. ह्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातील ८८शाळांमधून १७५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले . ही परीक्षा मराठी , इंग्रजीसोबतच उर्दू माध्यमातूनही घेण्यात आली . ह्या परीक्षेची प्रश्नपत्रिका रायगड जिल्ह्यातील अनुभवी व तज्ज्ञ गणित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली . या परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रायगड गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष एस.पी.चव्हाण , सचिव बी. जी. सय्यद, अनिल पाटील, जे.के. कुंभार , टिळक खाडे , पी. .जी.चिरमे, यासिन पोशिलकर , ए. सी.चिनके , पंकज मिरजोळकर , विक्रम काटकर , देवयानी मोकल आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले . ह्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना एका विशेष कार्यक्रमात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे .या उपक्रमाबद्दल रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे , विज्ञान पर्यवेक्षिका सविता माळी , रिना पाटील यांनी रायगड गणित अध्यापक मंडळाचे कौतुक केले आहे.
Comments
Post a Comment