जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते "पंचामृत वाचन पुष्प"चे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून साकारले हे "पंचामृत वाचन पुष्प"

रायगड (भिवा पवार) : जिल्हाधिकारी कार्यालयात "पंचामृत वाचन पुष्प" नावाच्या पुस्तकांच्या छोटेखानी पुस्तक दालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते काल दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी सद्भावना दिनानिमित्त संपन्न झाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के- पाटील, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ वरसोलकर, कर्मचारी संदीप भोईर हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात सन 2012 पासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या, वाचनाचे प्रचंड वेड असलेल्या श्री. हेमंत हिरालाल पाटील यांच्या पुढाकारातून हे छोटेसे पुस्तकांचे दालन साकारण्यात आले आहे.

सुरुवातीला छोट्याशा पेटीतल्या फक्त सहा पुस्तकांपासून सुरू झालेले हे "पंचामृत वाचन पुष्प" हे पुस्तकांचे दालन आज 256 पुस्तकांपर्यंत येऊन पोहोचले आहे.

श्री.हेमंत हिरालाल पाटील हे मूळचे धुळे जिल्ह्यातील. शिक्षण नववी उत्तीर्ण. काही अडचणींमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता आले नाही. मात्र उपजतच वाचनाची आवड असल्याने श्री.पाटील वेळ मिळेल तसा, प्रसंगी आवर्जून वेळ काढून विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करीत असतात. इतकेच नव्हे तर इतरांनाही पुस्तक वाचनाची सवय लागावी म्हणून स्वतःच सहा पुस्तकांपासून विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. श्री. हेमंत पाटील यांची ही चांगली सवय पाहून जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले श्री.एच.के.जावळे, श्रीमती शितल उगले,श्री. विजय सूर्यवंशी, श्रीमती निधी चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या "पंचामृत वाचन पुष्प" साठी पुस्तके देऊन श्री.पाटील यांच्या छंदाला पाठबळ दिले आहे.

श्री.पाटील यांनी या पुस्तकांची एक नोंदवही ठेवली असून ते शासकीय कर्मचाऱ्यांना ही पुस्तके वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही विविध विषयांवरील उपयुक्त पुस्तके संकलन करण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog