शिरवली आंबेगाणी आदिवासी वाडी शाळेची दुरावस्था!
शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रायगड (भिवा पवार) : माणगांव तालुक्यातील गोरेगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरवली आंबेगाणी जिल्हा परिषद शाळेची ३ जून २०२० च्या निसर्ग चक्रीवादळामध्ये शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असून शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील गणपत पवार व अन्य ग्रामस्थांनी केला आहे.
वादळात नुकसान झालेल्या या शाळेकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही. येथील शिक्षक व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केल्याचे समजते. मात्र येथे शासनाचा कोणताही अधिकारी फिरकला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण येथील अधिकाऱ्यांनी सुद्धा सदर शाळेला भेट दिली नाही. एकीकडे शासन म्हणतंय आदिवासींनी शिक्षण घेतले तरच त्यांचा विकास होईल, मात्र येथील शाळा वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे विद्यार्थी बसणार कुठे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा राहिलेला आहे. याबाबत रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व दक्षिण रायगड आदिवासी संघटना यांनी या शाळेला भेट दिली असून शिक्षण विभागाने शाळेची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आदिवासी समाजाला शिक्षण दिल्यास त्यांना त्यांचे हक्क समजतील व समाज जागा होईल! म्हणून शासन दुर्लक्ष तर करीत नाही ना? असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे.
Comments
Post a Comment