मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वाकण नाक्यावर मनसेचे चक्काजाम आंदोलन! प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
गोवे-कोलाड (विश्वास निकम) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ पळस्पे ते इंदापूर मार्गांवरील वडखळ, नागोठणे, कोलाड रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट झाली असून या महामार्गांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. या मार्गांवरून प्रवास करणारा प्रवाशी घरी सुखरूप जाईल याची खात्री देता येत नाही. शासनाने या महामार्गकडे दिलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सोमवारी दि.२२ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने वाकण नाक्यावर जनआंदोलन करण्यात आले.
मनसेचे नागोठणे विभागाचे युवा नेते हरिचंद्र तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली तसेच रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दिलीप सांगळे, अमोल पेणकर, प्रल्हाद पारंगे, अक्षय रटाटे साईनाथ धुळे,दीपेश्री घासे,नम्रता भिसे, विनायक तेलंगे, अमित पवार, रोशन बावकर,पंकज लवटे, शशांत पारंगे, अर्चना तेलंगे, कमलाकर तेलंगे,शुभम तेलंगे, नरेंद्र भिसे, यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला १२ ते १३ वर्षे पूर्ण झाली असून या कामात कोणतेही प्रगती नाही. याउलट या महामार्गावर पडलेले जिवघेणे खड्डे हे प्रवाश्यांच्या जीवावर बेतत आहेत.शिवाय काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला असून यासाठी या मार्गांवरून लाखो चाकरमानी प्रवास करीत असतात त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या मार्गाचे खड्डे भरून हा मार्ग प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी सुस्थितीत करावा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा मनसेकडून शासनाला देण्यात आला. रोहा नायब तहसीलदार राजेश थोरे व उपस्थित पोलिस अधिकारी यांनी मध्यस्थी करून आंदोलकांना खड्डे भरण्याचे आश्वाशन दिल्यानंतर ते स्थगित करण्यात आले.
Comments
Post a Comment