भाताण हायस्कूलमथ्ये अवतरली पंढरी!
विद्यार्थी रंगले पायी दिंडीत!
नागोठणे (प्रतिनिधी)रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय भाताण , ता. पनवेल येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला . यावेळी ' ज्ञानोबा - तुकाराम ' च्या गजरात शालेय परिसर दुमदुमून गेला . टाळ - मृदुंगाच्या तालावर नाचत , फुगड्या खेळत संपूर्ण गावातून शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण पायी दिंडी काढली . विशेष म्हणजे या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत भाताण गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा केल्यामुळे शाळेत पंढरी अवतरल्यासारखे वाटत होते.
या दिंडी सोहळ्यात विठ्ठलाच्या भूमिकेत इयत्ता नववीतील विद्यार्थी कु. हर्ष राम भोईर तर रखुमाईच्या भूमिकेत कु. अक्षता आत्माराम काठावले ( इ. ९ वी )तर वासुदेवाच्या भूमिकेत इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु. निखिल किशोर ठाकूर व कु. यश अनिल काठावले अवतरले होते. या दिंडी सोहळ्याचे भाताण ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत केले व या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले. दिंडी सोहळ्याच्या समारोप प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत मोकल म्हणाले की , " शाळा हीच आमची पंढरी आणि ह्या शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या रुपात आम्हाला विठ्ठल दिसतो व तो रोज आमच्याशी बोलतो . या बाकावर बसलेल्या विठ्ठलाची पूजा हीच आमची वारी ! " मुख्याध्यापकांच्या या भावपूर्ण मनोगतामुळे उपस्थित ग्रामस्थांचे व मान्यावरांचे मन हेलावून गेले.
हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत मोकल , शाळेतील उपक्रमशील शिक्षिका देवयानी मोकल,सारीका उकिरडे , मनिषा ख॔डालीकर , गणेश दुर्गे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले . या दिंडी सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शाळेतील शिक्षक गणेश दुर्गे यांनी केले.
Comments
Post a Comment