नितीन पाटील आरोग्य खात्यातून सेवा निवृत
सुतारवाडी :- (हरिश्चंद्र महाडिक) नितीन रामचंद्र पाटील आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपली सेवा ३७ वर्षे २ महिने ११ दिवस एवढी करून शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत झाले. शालेय जीवनात असताना सुंदर हस्ताक्षर, गोड आवाज आणि सर्वांशी आदराने वागणाऱ्या नितीन पाटील आरोग्य खात्यामध्ये वाहन चालकाची नोकरी स्विकारून सेवा निवृत्ती पर्यंत विना अपघात उत्कृष्ट सेवा केली. ९ जानेवारी १९८५ साली आरोग्य खात्यात रुजू झाल्यानंतर प्रथम अलिबाग नंतर पनवेल त्यानंतर पुन्हा अलिबाग येथे बदली झाली. १९८५ च्या काळात रस्त्यांची अवस्था बिकट होती. कुटुंब नियोजनाच्या रुग्णाला घरोघरी जावून पोहचवावे लागत असे रात्री अपरात्री कधी ही ग्रामीण भागात जावे लागत असे वाहनाला कधी धक्का मारुन सुरु करावे लागत होते तर कधी वाहन पंक्चर तर कधी लाईट खराब अशा बिकट परिस्थितीतही नितीन पाटील यांनी कधीही रूग्णांना मध्येच रस्त्यावर सोडले नाही.
नितीन पाटील यांच्या सेवा काळात देवी निर्मूलन, नारु निर्मूलन, कुष्ठरोग निर्मूलन तसेच पल्स पोलिओ निर्मूलन च्या वेळी उत्तम सेवा दिली. ज्यावेळी १९८९ मध्ये महापूर आला होता त्यावेळी मोठी भिषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आरोग्य सेवेवर खूपच ताण पडला होता. प्रत्येक कर्मचारी आप आपली सेवा चोखपणे बजावत होते. त्यावेळी नितीन पाटील यांच्याकडे असलेले वाहन घेवून ते रोज मुंबई येथे औषध आणण्यासाठी जात होते. कधी-कधी तर दिवसातून दोन वेळा जावे लागत होते.
वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रकारची वाहनं शासकिय कार्यालयांना देण्यात आली. त्यामुळे वाहन चालकांना चांगली सेवा देता आल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले. नितीन पाटील यांच्याकडे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लस साठा वाटप करण्याचे काम आले तेही त्यांनी चांगल्या प्रकारे केले. कोविड १९ च्या महामारी च्या काळात वाहन चालकांची कसोटीच होती. संपुर्ण सेवा काळात त्यांच्या पत्नीची साथ मोलाची होती. सेवानिवृती च्या दिवशी अनेक अधिकारी वर्ग, मित्र परिवार, नातेवाईक अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment