राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची निवड

रायगड (भिवा पवार)भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या वैज्ञानिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा , त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागावी , त्यांना सर्वेक्षण पद्धतीचे आकलन होऊन त्यांच्यामध्ये जिज्ञासा , निरिक्षण, तर्कसंगत विचार हे गुण वृद्धींगत व्हावेत ह्या उद्देशाने ह्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते . ' शाश्वत विकासासाठी विज्ञान ' हा यावर्षीच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय आहे. तालुका , जिल्हा , राज्य व राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते . ह्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहभागी विद्यार्थ्यानी ऑनलाईन पद्धतीने आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले .रायगड जिल्ह्यातील तीन प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे . हे तीन प्रकल्प व सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत- १) कोको पीट गार्डनिंग ( अक्षरा ठाकूर व आर्या म्हात्रे - श्रीमती भागूबाई ठाकूर विद्यालय द्रोणागिरी , ता. उरण ) २ ) परफेक्ट न्युट्रीशनल फूड फाॅर प्रेगनंट वूमेन ( ध्रुवी मोकल व सायली महाडीक - महात्मा गांधी विद्यालय चोरढे , ता. मुरुड ) ३) इंटीग्रेशन ऑफ व्हायटल मेझरमेंट डिव्हायसेस ॲन्ड बेसिक लाईफ सपोर्ट प्रोसिजर ( निकुंज चौबे व सिद्धार्थ तिवारी - अपीजय स्कूल खारघर, ता. पनवेल ) हे तीन प्रकल्प यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक, सर्व तालुका समन्वयक , जिल्हा समन्वयक अनिल पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले . यशस्वी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे , रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना पवार शिंदे , विज्ञान पर्यवेक्षिका सविता माळी , रीना पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे . ठाणे येथील जिज्ञासा ट्रस्ट यांनी राज्यस्तरीय बालविज्ञान पलिषदेचे यशस्वी आयोजन केले . यासाठी जिज्ञासा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे व त्यांच्या सहका-यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रीय स्तरावरील बालविज्ञान परिषदेचे आयोजन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गुजरात सायन्स सिटी मार्फत ऑनलाईन पध्दतीने केले जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog