शेतक-यांच्या फसवणुकी विरुद्ध अखेर गुन्हा दाखल,
दलाल लाॅबीला मोठा धक्का!
सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या प्रयत्नांना यश,
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यात चणेरा विभागात बल्क ड्रग्ज फार्मा पार्क साठी जमीन संपादन सुरू असलेल्या गावामध्ये शेतक-यांची फसवणुक व जमिनीचे गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने या प्रकरणांची पोळ खोल करण्यासाठी सर्वहारा जन आंदोलन च्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्धत प्रयत्न केला होता. याबाबत चर्चा करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक दुधे साहेब यांनी दि 5/1/2022 रोजी सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा उल्का महाजन व रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार सह आदिवासी व शेतकरी बांधवांना याकरिता बोलावले होते.
सदरच्या चर्चेत जिल्हा पोलिसाधीक्षक दुधे यांनी प्रथमतः त्यांचे प्रश्न समजून घेऊन यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश रोहा पोलिस स्टेशन च्या अधिका-यांना दिले. सदर फिर्यादीनी तक्रार नोंदवून आता पाच महिने उलटले आहेत. तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे अधीक्षक साहेबांनी आदेश दिल्यावर काल दि 6/1/2022 रोजी गणेश कोल्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम ४१९, ४२० ,४६५ ,४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वहारा जनआंदोलन संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.तसेच गणेश कोल्हटकर यांचे पणजोबा हशा नागू कोल्हटकर १९७५ साली मृत्यू पावले असताना त्यांच्या वतीने तोतया इसम उभे करून २०११ मधे त्यांच्या मालकी हक्काची जमीन विकण्यात आली.
हा प्रकार कोल्हटकर कुटुंबात कळल्यावर त्यांनी संघटनेकडे धाव घेतली. या प्रकरणात सर्व कागदपत्रे मिळाल्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सतत प्रयत्न केले. परंतु या परिसरात दलाल मंडळींना राजकीय वरदहस्त असल्याने पोलिस ठाण्यात याची गांभीर्याने देखील दखल घेतली गेली नाही.
तसेच आणखी एका प्रकरणात दत्ता कांबळे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या वृद्ध आईलाच आरोपी केले होते. ज्या अपंग व निरक्षर आहेत सदर प्रकार पोलिसांनी जाणूनबूजून इतर शेतकरी ज्यांची फसवणूक झाली होती त्यांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव तंत्राद्वारे केला. याकडे देखील श्री दुधे यांनी लक्ष वेधले आहे त्यामुळे याची गंभीर दखल घेत उर्वरित शेतकरी बांधवांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दुधे यांनी रोहा पोलिस ठाण्याच्या च्या अधिकारी वर्गाला आदेश दिले आहेत.
त्यामुळे या अन्याविरोधाची दखल घेत सर्वहारा जन आंदोलन च्या व शेतकरी बांधवांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक दुधे साहेब यांचे आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment