माणगांव पंचायत समितीवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा

 सभापती पदी विलास शिंदे तर उपसभापती पदी मनिषा मालोरे यांची बिनविरोध निवड 

कोलाड (विश्वास निकम) माणगांव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा फडकला असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा संदेश मालोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे माणगाव पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे

   माणगाव पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली होती. या निवडणुकीत एकूण ८ पैकी ५ जागांवर शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे पंचायत समितीवर शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक राहिले. राज्यात महायुतीची सत्ता असल्याने माणगाव पंचायत समितीतही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत सभापती व उपसभापती पदाची निवडणूक लढवली.

   सभापती व उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती माणगाव येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप तसेच गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

         नवनिर्वाचित सभापती विलास यशवंत शिंदे हे अतिशय हुशार आणि तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असुन त्यांनी इंदापूर परिसरात अनेक विकास कामे केली आहेत यामुळे त्यांच्या सभापती निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असुन या निवडीमुळे विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Comments

Popular posts from this blog